श्री समर्थ सेवा मंडळाचे कार्य

9 जानेवारी 1950 या दिवशी श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड ही संस्था रजिस्टर्ड झाल्यानंतर समर्थभक्त बाबुराव वैद्यांनी आपल्या कल्पक बुद्धीने सांप्रदायाचा जीर्णोद्धार करण्यासाठी अनेक योजना आखल्या.

1

श्री समर्थ पादुका प्रचार दौरा -

श्री समर्थ सेवा मंडळ स्थापन झाले त्यावेळी सज्जनगडावर येण्यासाठी परळीच्या पायथ्या पासून संपूर्ण गड चढावा लागत असे. गडावर आल्यावर राहाण्याची सोय नाही, जेवणाची सोय नाही, नित्यविधीची धड सोय नाही, वीज नाही. यामुळे उत्सव सोडला तर एरवी भाविकांची ये-जा नसे. भाविकांचा सहभाग असल्याशिवाय समर्थकार्याचा प्रसार होणार नाही हे जाणून कै.बाबुराव वैद्य यांनी श्री समर्थांच्या पादुका घेऊन महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर भिक्षा दौरा अयोजित करण्याची संकल्पना मांडली आणि निस्पृह रामदासींच्या सहकार्याने ती मूर्त स्वरुपात आणली. प्रथम बद्रीनारायणाला पादुका नेल्या, वाटेत मोठी शहरे घेतली त्यावेळी झालेल्या स्वागत सोहळ्यामूळे श्री समर्थ कृपेची ओढ समाजात किती आहे याचा प्रत्यय आला आणि पादुका प्रचार दौ-याची कार्य पद्धती निश्चीत झाली. 1949 साला पासून श्री समर्थ सेवा मंडळाने चालू केलेल्या पादुका प्रचार दौ-यामुळे लोकांना समर्थ कार्याचा, वाङ्मयाचा, तत्वज्ञानाचा परिचय झाला. या प्रचार दौ-यांमुळे सज्जनगडावर दर्शनार्थींचा ओघ सुरू झाला. समर्थ कार्यासाठी आवश्यक अर्थ सहाय्य लाभले, यातूनच जीर्णोद्धाराच्या कार्याला गती मिळाली .

2

सज्जनगड मासिक -

समर्थ विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मुद्रीत स्वरुपात प्रचार साधन हवे म्हणून 1951 ला प्रथम पत्रिकास्वरुपात व लगेचच मासिक स्वरुपात " सज्जनगड मासिक '' सुरु झाले . त्यामुळे समर्थांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा, कार्याचा,आणि वाङ्मयाचा परिचय महाराष्ट्रात झाला. सेवा मंडळाने हाती घेतलेल्या समर्थ सांप्रदायाच्या जीर्णोद्धार कार्याचा लोकात प्रचार झाला. मासिकाला परदेशातूनही मागणी येऊ लागली.

3

वाङ्मय प्रकाशन -

समर्थ वाङ्मय लोकांपर्यंत पोहोचवून लोककल्याण साधावे या हेतूने समर्थ सेवा मंडळाने 1953 पासून ग्रंथ प्रकाशनास सुरुवात केली. त्यात प्रथम सचित्र सज्जनगड, मनाचे श्लोक, समर्थ चरित्र, नित्यनेम सोपान, समर्थां चे फोटो यांचे प्रकाशन झाले.

या प्राथमिक उपक्रमा बरोबरच बाबुराव वैद्य यांनी मान्यवरांच्या भेटी घेऊन राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींच्या सज्जनगडाचा जीर्णोद्धार किती आवश्यक आहे हे लोकांना पटविले. त्यातून नियमित वर्गणी देणारे लोक मिळविले. काहींनी मोठ्या देणग्या दिल्या. सामान्य लोकही जमेल तेवढी मदत करु लागले. येणा-या पैशाचा चोख हिशोब व पत्र व्यवहार स.भ. माधवराव हिरळीकर यांनी उत्तम सांभाळला. येणा-या देणगीतून एकीकडे जीर्णोद्धाराच्या कार्याला दिनकर बुवा, अय्याबुवा आदि निस्पृह रामदासींनी वाहून घेतले. सज्जनगडाचा काया पालट होऊ लागला.

या प्रमाणे श्री समर्थ सेवा मंडळाच्या कार्याला श्री श्रीधर स्वामींचा आशिर्वाद व कै.बाबुराव वैद्य व कै.माधवराव हिरळीकर, कै.बन्याबापू गोडबोले , स.भ. अरूणराव गोडबोले , माजी कार्यवाह कै. दिनकर बुवा , विद्यमान कार्यवाह स.भ. मारुती बुवा व इतर अनेक निस्पृह रामदासी मंडळी यांचे अथक प्रयत्न व असंख्य दानशूर भक्तांचे तन-मन-धनाचे सहाय्य यातून सज्जनगडाचा काया पालट झाला व दूरवर सांप्रदायाचा प्रसार झाला.

1938 सालापासून सुरु केलेल्या कार्याचा आता वटवृक्ष झाला आहे. हे समर्थ विचार प्रसार कार्य यापुढेही समर्थ भक्तांच्या व सेवा मंडळाच्या तळमळीच्या कार्यकर्त्यांकडून सज्जनगडावर व शिवथरघळ येथे असेच जोमाने सुरु राहील.